दुबळी माझी झोळी...

प्रत्येकाच्या मनात आपल्या माणसांच्या साठी एक हळवा कोपरा असतो.  आपल्या माणसाच्या आठवणी आपल्या मनाच्या कुपी मध्ये कशा जतन करायच्या याची प्रत्येकाची एक पद्धत असते.  कुणी त्यांच्या आवडीचा एखादा पदार्थ वर्षभरासाठी सोडून देतात, कुणी त्यांचे फोटो लावतात,  कुणी त्यांचे दागिने किंवा त्यांच्या वापरातल्या इतर कोणत्या गोष्टी जपून ठेवतात, कुणी त्यांच्या नावे देणगी देतात, कुणी त्यांच्या आठवणी कागदावर उतरवतात. माझ्या मनात जेव्हा आईचा विचार येतो तेव्हा या सगळ्या गोष्टी फार तोकड्या वाटतात. आई जाताना एव्हढा मोठा वारसा मागे सोडून गेली आहे की त्याच जतन कसं करता येईल हा विचार मनात डोकावतो. "घेता घेता घेणाऱ्याने देणाऱ्याचे हात घ्यावे" हाच एक मार्ग दिसतो. जर हा वारसा जपायचा असेल तर आपल्या मनाला भावतील आणि आपल्याला शक्य होतील त्या गोष्टी आपल्या अंगी बाणवायला हव्या.  

आई फार श्रद्धाळू होती. रोज दारात शुभ चिन्हांनी युक्त रांगोळी असायची. दारात चपलांचा स्टँड आल्यानंतर तिने देवघरासमोर काळ्या ग्रॅनाईटवर रांगोळी काढायची. रोज संध्याकाळी देवासमोर दिवा न चुकता लावायची. व्रत वैकल्यांवर तिचा विश्वास होता. दर मंगळवारी ती उपास करायची आणि लाल साडी नेसायची. अनेक वर्ष कसबा गणपतीला 21 प्रदक्षिणा घालायचा तिचा नेम होता. हरतालिका, गौरी गणपती,  नवरात्र या दिवसात उपास असायचे, सवाष्ण जेवायच्या.  वारीच्या दिवसात वारकरी मंडळी भेटायला यायची. आईच्या जुन्या साड्या,  दक्षिणा घेऊन रवाना व्हायची. 

माझं मन या सगळ्या गोष्टीत फार रमत नाही. पण मी नास्तिकही नाही. तिन्ही सांजेला मी बहुदा घरी नसते. पण कितीही उशीर झाला तरी देवासमोर दिवा लावल्या शिवाय झोपत नाही. मला एखाद्या दिवशी फार फार उशीर झाला तर मुलगा न सांगता दिवा लावून टाकतो. नुकतेच घरी काम झालं तेव्हा दारासमोर छोटा ग्रॅनाईट लावला. आता त्यावर रोज छोटीशी रांगोळी काढते. ही सगळी आईकडून मिळालेली प्रेरणा असं म्हणायला हरकत नाही. घरी गणपती बसवते. माझ्या सासरी तळणीचे मोदक करतात. पण उकडीच्या मोदकांशिवाय मजा नाही. त्यामुळे उकडीचे मोदक करायला शिकले आणि आता दर वर्षी एक दिवस उकडीचे मोदक आणि एक दिवस तळणीचे मोदक बनतात. 

आईला मी नाक टोचायला हव असं वाटायचं. लग्नाच्या आधी तिने 2-3 वेळा तसं सुचवून पहिलं होतं. पण मी फार उत्साह दाखवत नाही असं पाहून ते सोडून दिलं. तिचं स्वतःच नाक टोचलेल होतं आणि तिला चमकी घालण्याची हौस होती. तिने एक हिऱ्याचा खडा बसवलेली चमकी घेऊन ठेवली होती. ती घालायची संधी मात्र मिळाली नाही. आई गेल्यावर तिची आठवण म्हणून मी नाक टोचलं. 

आईचा नीटनेटकेपणा आणि शिस्त आधी पासून होतीच. पण मी कितीही व्यवस्थित आवरलं तरी त्याला आईची सर नाही. अमळ काही तरी कमी आहे असंच वाटत रहातं. 

तिची माणसं जोडून ठेवण्याची हातोटी विलक्षण होती.  मग ती सासरची मंडळी असोत, माहेरची मंडळी असोत, लेकी असोत, सुना असोत, मैत्रिणी असोत किंवा की घरात कामाला येणार्‍या बायका असोत. तिचे संबंध सगळ्यांशी चांगले होते, सगळ्यांच्या मनात तिच्याबद्दल आदर होता. घरी कामाला येणार्‍या बायकांसाठी सुद्धा त्यांच्या आवडी निवडी प्रमाणे चहा कॉफी बनायची. शिवाय त्यांना किती कारणांसाठी आर्थिक मदत केली याचा तर हिशेबच नाही. तिच्याकडे किती जणांची खाती चालू कुणास ठाऊक. आमच्याकडे  30-35 वर्ष काम करणाऱ्या सुभद्रा बाईना जेव्हा वयोमानामुळे भांडी धुण्याची काम जमेनात तेव्हा त्यांची गरज ओळखून तिने त्यांना जमतील अशी कामं देऊन पगार चालू ठेवला. तिच्या लेखी शिक्षणाला खूप महत्व होतं.  त्यामुळे ती कधी गरजू मुलींची फी भरायची, कधी वह्या पुस्तकांचे पैसे द्यायची, कधी गणवेषाचे पैसे द्यायची आणि ते ही गुपचूप.  

माझे पण माझ्याकडे काम करणार्‍या बायकांच्या बरोबर आर्थिक व्यवहार चालू असतात. कधी मुलीच्या लग्नासाठी पैसे दिले आहेत, कधी औषध पाण्याचे पैसे दिले आहेत. त्यांना अधून मधून जुने कपडे देत असते. गरज लक्षात घेऊन 1-2 मुलांची फी भरली आहे. पण आई एव्हढा हात सैल सुटत नाही. आमच्या चहा घ्यायच्या वेळेला बाई घरी असेल तर चहा पण देते. पण त्यांच्या आवडी निवडी जपणं वगैरे काही होत नाही. मध्ये एकदा आमची कामवाली बाई रात्री उशिरापर्यंत घरी पोहोचली नाही त्या दिवशी प्रकर्षाने जाणवलं की आपल्याला तिच्या बद्दल किती कमी माहिती आहे. तरी ती माझ्याकडे 19 वर्षापासून काम करत आहे. 

लग्न झाल्यावर ती मला घरी एकाही कामाला हात नाही लावू द्यायची. तुम्ही तुमच्या घरी कामं करता तेव्हढं पुरेसं आहे म्हणायची. ती अगदी आजारी असली तरी तिला त्याचीच काळजी. त्यामुळे स्वतःच्या घरी कामाला बायका असल्यामुळे कामाचा त्रास नसला तरी माहेरी गेल्यावर छान वाटायचं. मी ही माझ्या घरी तोच प्रयत्न करते. 

आई खूप लहान असल्यापासून तिच्यावर स्वयंपाकाची जबाबदारी पडली. शिवाय आजोबांच्या हॉटेलसाठी सुद्धा सकाळी कॉलेजला जायच्या आधी पुरी भाजी, शिरा वगैरे बनवून द्यायला लागायचा. लग्नानंतरसुद्धा शाळेत जाण्याआधी आमच जेवण बनवून जायची. शिवाय पाहुणे रावळे असायचेच. आमच्या घरी किती जणांचे साखरपुडे, डोहाळजेवण झाली याची तर गणतीच नाही. ती साक्षात अन्नपूर्णा होती. 

मला स्वयंपाकाची आवड नाही आणि मी स्वयंपाकाला बाई लावीन यावर आईशी वाद घालता घालता लग्नही झालं. तेव्हा मला साधा कुकर सुद्धा लावता येत नव्हता. हळूहळू गरजेप्रमाणे स्वयंपाक करायला शिकले. इतर लोक टाळतात अशा तूप, लोणच या गोष्टी घरी बनवते. लोक म्हणतात हाताला चव आहे. आजकाल यू ट्यूब वर पाक कृती पाहाता येतात, शिकता येतात, त्या करता येतात आणि त्या चांगल्याही होतात. पण त्यांना आईच्या हाताची चव रहात नाही. मागे वळून पाहताना वाटतं की आई कडून बरच काही शिकायचं राहून गेलं. 

तिचा सोशिकपणा,  कुरकुर न करता काम उरकून टाकणे, कुठल्याही परिस्थितीत डगमगून न जाता तिचा खंबीरपणे सामना करणे... एक ना दोन... अशी तिच्याकडे पाहून अंगी बाणवण्यासारखी खूप मोठी यादी आहे. माझी पत्रिका पाहून तुझ्या पाठीशी तुझ्या आईची पुण्याई आहे असं मला कुणी तरी सांगितलं होतं. आणि ते खरंही आहे. तिने तर सगळ्याची मुक्त हस्ताने उधळण केली. पण तिच्याकडे पहाता परत परत जाणवतं "देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी..."






Comments

  1. एकदम बरोबर लिहिल आहे. दानधर्म कसा करावयाचा, कोणत्या पद्धतीने करायचा, आणि कोणत्या व्यक्तीला त्याच्या गरजेनुसार कसा करावयाचा हे त्यांच्याकडून आम्हाला लक्षात आले. आम्ही तो वारसा थोड्याफार पद्धतीने जसा जमेल तसा आमलत आणयाचा प्रयत्न करतो.

    ReplyDelete
  2. वहिनींची आठवण ताजी केलीस. खरच त्यांचा खुप आधार होता.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

आईचा वारसा

दरवळ