दरवळ
परवा मी रिक्षाने बाहेर जात असताना सिग्नल जवळ अचानक परिचित सुगंध जाणवला. एप्रिल महिना चालू झाला की मोगरा अणि मोगऱ्याच्या फुलांचे गजरे यायला सुरुवात होते. मोगरा म्हटला की आईचीच आठवण येते. आईला मोगरा फार आवडायचा. पूर्वी एप्रिल महिना सुरू झाला की रोज दारावर मोगऱ्याची फुलं विकायला यायची. आई रोज पाव किलो फुलं विकत घ्यायची. फुलांपेक्षा कळ्याच असायच्या. आई कळ्या उमलतील याची परत परत विचारून खातरजमा करुन घेऊन मगच फुलं घ्यायची. ती फुलं ओवून गजरे तयार करणे रोजचा उद्योग असायचा. ते गजरे मग ओल्या कापडात गुंडाळून ठेवायचे. सकाळपर्यंत गजरे छान उमलायचे. कुठेही जाताना हमखास गजरा माळून मगच बाहेर पडायची. बाहेर नाही गेलं तर घरात गजरा माळून बसायची. दिवसभर मोगऱ्याचा सुगंध दरवळत रहायचा. कुणाच्याही घरी काही कार्य असलं की गजरे आणण्याची जबाबदारी हमखास तिच्याकडे असायची. आईला एकंदरीत झाडांची खूप हौस होती. झाडांची म्हणण्यापेक्षा फुलझाडांची हौस होती असं म्हणायला हरकत नाही. आमच्या छोट्याश्या गच्ची मध्ये विविध फुलझाडांची रेलचेल होती. आमच्याकडे देशी गुलाब ह...