दरवळ
परवा मी रिक्षाने बाहेर जात असताना सिग्नल जवळ अचानक परिचित सुगंध जाणवला. एप्रिल महिना चालू झाला की मोगरा अणि मोगऱ्याच्या फुलांचे गजरे यायला सुरुवात होते. मोगरा म्हटला की आईचीच आठवण येते. आईला मोगरा फार आवडायचा. पूर्वी एप्रिल महिना सुरू झाला की रोज दारावर मोगऱ्याची फुलं विकायला यायची. आई रोज पाव किलो फुलं विकत घ्यायची. फुलांपेक्षा कळ्याच असायच्या. आई कळ्या उमलतील याची परत परत विचारून खातरजमा करुन घेऊन मगच फुलं घ्यायची. ती फुलं ओवून गजरे तयार करणे रोजचा उद्योग असायचा. ते गजरे मग ओल्या कापडात गुंडाळून ठेवायचे. सकाळपर्यंत गजरे छान उमलायचे. कुठेही जाताना हमखास गजरा माळून मगच बाहेर पडायची. बाहेर नाही गेलं तर घरात गजरा माळून बसायची. दिवसभर मोगऱ्याचा सुगंध दरवळत रहायचा. कुणाच्याही घरी काही कार्य असलं की गजरे आणण्याची जबाबदारी हमखास तिच्याकडे असायची.
आईला एकंदरीत झाडांची खूप हौस होती. झाडांची म्हणण्यापेक्षा फुलझाडांची हौस होती असं म्हणायला हरकत नाही. आमच्या छोट्याश्या गच्ची मध्ये विविध फुलझाडांची रेलचेल होती. आमच्याकडे देशी गुलाब होते, चिनी गुलाब होते, अबोली होती, तगर होती, सदाफुली होती, रातराणी होती, कोरांटी होती, मोगरा होता, सोनटक्का होता, निशिगंध होता, लिली होती, ब्रह्मकमळ होतं, अगदी मे फ्लॉवर सुद्धा होतं. त्यामुळे वर्षभर कुठली ना कुठली फुलं फुललेली असायची. एवढी झाडं होती म्हणून ती झाडात खूप रमायची असं नाही. पण झाडांना पाणी मात्र नित्यनेमाने घालायची. उन्हाळ्यात झाडं सुकून जायची म्हणून सकाळ संध्याकाळ पाणी घालायची. बाकी महिन्या दोन महिन्यातून माळीबाबांना घरी बोलावून खत घालणे, तण उपटणे, माती सैल करुन घेणे वगैरे काम करून घ्यायची. घरी एव्हढी झाडं असली तरी तिचं सुगंधी फुलझाडांवर मनापासून प्रेम होतं. रातराणी बहरली किंवा पावसाळ्यात सोनटक्क्याचा घमघमाट सुटला की आईच्या बोलण्यातून उत्साह उतू जायचा. सोनटक्क्यासाठी तर तिच्या मैत्रिणी नंबर लावून ठेवायच्या. आमच्या लग्नानंतर सुद्धा ऐन मोसमात घरी गेलं की सोनटक्क्याच्या फुलांचा छोटा गुच्छ आमच्यासाठी राखून ठेवलेला असायचा.
अगदी फोनवर बोलताना सुद्धा तिच्या नुसत्या आवाजावरून तिचा चेहरा किती उजळला असावा याची कल्पना करता यायची. कुठल्या झाडाला बहर आला आहे, कुठलं झाड मरगळून गेलं आहे हे विषय नियमितपणे ऐकायला मिळायचे. अधून मधून अमूक एकानी अमुक रोप दिलं आहे, तमुक कुणाला तरी अमक्या झाडाचा कांदा हवा आहे असे संवाद कानावर पडायचे.
तिच्यामध्ये ही आवड बहुधा आजीकडून (तिच्या आई कडून) वारशाने आली असावी. केसात फूल मिळाल्याशिवाय घराबाहेर पाऊल ठेवायचं नाही ही आजोबांची कडक शिस्त. घरात फूल नसेल तर केसात तुळशीच पान घालून जा अशा संस्कारात ती लहानाची मोठी झाली. त्यामुळे तिला फुलांची आवड नसती तर नवल होतं. आजीच्या हाताला गुण आहे असा तिची ठाम विश्वास होता. आणि ते खरंही होतं. मी आजीकडची झाडं जगली नाहीत असं फार क्वचित ऐकलं आहे. आजी उरलेलं पातळ ताक, चहापत्ती असं काहीबाही झाडांना देत रहायची आणि झाडंही हिरवीगार डोलत असायची.
मोगऱ्याचं फक्त निमित्त झालं. मोगरा दिसला की तिची आठवण आल्याशिवाय रहात नाही. तिचा स्मृतीगंध जपून ठेवलेली हळवी कुपी हलकीशी उघडली जाते. तिचा सुवास मनभर दरवळतो आणि मायेची वीण अजून घट्ट करून जातो.
खरंच आहे. पण तुझं लेखन ही तेवढेच आठवणीचा सुगंध निर्माण करत आहे
ReplyDeleteखूप छान. मी पण या सर्वातून गेली आहे. आठवणी ताज्या झाल्या. 💐
ReplyDeleteफारच छान लिहिलं आहे. यामुळे आमच्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या. निर्मला मामी प्रत्यक्ष डोळ्यासमोर अजूनही दिसतात. त्यांची शिस्त अजूनही आम्ही पाळत आहे.
ReplyDeleteआईला मोगरा आवडायचा. मोगरा दिसला की तिची आठवण येते
Delete