आईचा वारसा
मी जशी मोठी झाले तस मला नेहेमी वाटायचं की मी माझ्या बाबांची मुलगी आहे. खूप लोक सांगायचे की मी अगदी बाबांसारखी दिसते. अगदी दुसरा विनूच. आईचे केस कुरळे तर माझे सरळ.
आई बोलायला रोखठोक. एकदम स्पष्टवक्ती. एक घाव दोन तुकडे. तर बाबा एकदम शांतपणे बोलणार. शक्यतो समोरची व्यक्ती दुखावली जाऊ नये असं बोलणार. आणि गरज असल्यास diplomatically बोलणार. मी गोड बोलून सगळी कामं करवून घेणारी. समोरच्या व्यक्तीचा बोलण्याचा रोख ओळखून वागणारी आणि बोलणारी. आई पटकन चिडणारी तर बाबा कमालीचे शांत. माझ्यावर रागावयाचे प्रसंग एकंदरीत कमीच यायचे. आई कमालीची शिस्तीची तर मी नीटनेटकी. आणि आई जरा अतीच करते या मताची. आई श्रद्धाळू, मनापासून पूजापाठ आणि उपासतापास करणारी तर आम्ही आपले बुद्धिवादी. मन चंगा तो कठौती में गंगा मानणारे. कर्मकांडाच्या अगदी विरुद्ध. आई म्हणजे सुगरण. २५-५० माणसांचा सहज स्वयंपाक करणारी तर मी स्वयंपाक शिकण्याची काय गरज आहे असा वाद घालणारी. आईला शिवण कामाची आणि भरतकामाची आवड तर मी धावदोरा आणि टीप घालता आली तर त्यातच धन्यता मानणारी. आई फार नि:स्वार्थीपणे सगळ्यांना मदत करणारी तर मी आपल्याच व्यापात गुरफटलेली. त्यातल्या त्यात आम्ही दोघीही कॉमर्सच्या विद्यार्थिनी एवढंच आमच्या दोघींमध्ये साम्य! त्यामुळे मला कधीच कुणी आईची सावली असं म्हटलं नाही आणि मलाही त्याची कधी खंत वाटली नाही.
नंतर लग्न झालं. जशा नवनवीन जबाबदाऱ्या पडायला लागल्या तसं सगळं चित्रच पालटून गेलं. प्रत्येक गोष्ट जागच्या जागी ठेवली गेली पाहिजे असा आग्रह चालू झाला. चहा दुधाची पातेली ठरून गेली. नेहेमी लागणाऱ्या गोष्टी ठेवण्यासाठी ठराविक डबे ठरून गेले. पातेल दुसऱ्या गोष्टीसाठी वापरल्यावर कपाळावर आठी पडायला सुरुवात झाली. चहा साखरेचे ठरलेले डबे दुसरं काही ठेवण्यासाठी कुणी कास काय वापरू शकतं असं कोडं पडायला सुरुवात झाली. ८:२१ ची फास्ट लोकल पकडण्याच्या सकाळच्या गडबडीमध्ये अशा छोट्या छोट्या गोष्टीमुळे फरक पडतो हे समजायला लागलं. त्यात कुणी गडबड केली की पटकन पारा चढायला सुरुवात झाली. कधी कुणी अमुक एक गोष्ट कुठे ठेवली आहे असं विचाल्यावर अमुक या कपाटात मधल्या काप्प्यामध्ये डावीकडून दुसरा डबा बघ अशी उत्तरं द्यायला सुुरुवात झाली. कपड्यांचं कपाट हा तर कौतुकाचा विषय झाला.
घरी रोजच्या स्वयंपाकाला मावशी येतात. पण घरात छोटं मूल रांगायला लागल्यावर "स्वयंपाक शिकण्याची काय गरज", "स्वयंपाकाला बाई ठेवता येईल इतके पैसे कमवीन" असा वाद घालणारी मी चक्क थोडे थोडे पदार्थ बनवायला सुरुवात केली. मुलांनी सारखं बाहेरचं खायला नको म्हणून नवे पदार्थ शिकायला आणि करायला सुरुवात केली. बाहेरची लोणची आवडत नाहीत म्हणून लिंबू आणि मिराचीचं लोणचं घरी बनवायला लागले. जेव्हा तुझ्या फोडण्या चांगल्या बसतात अशी आईने पावती दिली तेव्हा थोडी कॉलर ताठ झाली. तुझ तूप खाऊन आजीच्या तुपाची आठवण झाली असं म्हणाली तेव्हा थेट ढगावर जाऊन पोहोचल्यासारख वाटलं.
आईला खरेदीची फार हौस. विशेषतः साड्या आणि स्टेशनरी हे विशेष जिव्हाळ्याचे विषय. Cheaper by dozen हे तिने किती गंभीरपणे घेतलं होता याचा प्रत्यय आम्हाला तिच्यामागे घर आवरताना आला. "आई - एक आठवण" च्या ऐवजी "आई एक साठवण" असा लेख लिहिता येईल असं वाटलं. आईचं कपाट आवरताना आईची चेष्टा केली खरी पण आज माझं कपाट उघडलं तरी तेच चित्र दिसेल याची खात्री पटली. मला पण स्टेशनरी आणि कपडे खरेदीची फार हौस आहे.
आई फार मोठ्या मोठ्या जबाबदाऱ्या अगदी सुलभ रित्या पेलायची. कधीच कुठल्या कामाचा बाऊ नाही. तिला कर्तव्याचं कधीच ओझं वाटलं नाही. तिचं त्या व्यक्तीशी पटो अगर न पटो ती कर्तव्याला कधीच चुकली नाही. तिने सगळ्यांना फार लिलया बांधून ठेवलं होतं. परत या सगळ्यांबद्दल चकार शब्द बोलायची नाही. आमच कुटुंब खूप मोठं आहे. रक्ताच्या नात्याने जोडलं गेलेलं आणि तिच्या चांगुलपणामुळे वृध्दींगत झालेलं. पण कुणाशी भांडणतंटे नाहीत, फार कधी रुसवेफुगवे नाहीत, कधी कुणाच्या अध्यात मध्यात नाही.
आम्हाला उपदेशाचे डोस आधीच मिळाले नाहीत. पण प्रत्यक्ष कृतीमधून या सगळ्या गोष्टीचं बाळकडू निश्चित मिळालं. आज तिच्या या संस्कारांच प्रतिबिंब आम्हाला आमच्या संसारामध्ये नक्कीच पाहायला मिळतं.
ती फार खमकी होती. मी तिला कुठल्याच प्रसंगी डगमगून जाताना पाहिलं नाही. मग आप्पांचं आजारपण असो, बाबांचा अपघात असो की तिचं स्वतःचं आजारपण असो. तिला मूत्रपिंडाचा विकार झाला आणि डायलिसिस सुरू झालं. नंतर २ वेळा cardiac arrest झालं. पण तिने कधीच त्याचा त्रागा केला नाही की आजारपणाचा भांडवल केला नाही. हे सगळं मलाच का झालं असही कधी म्हणाली नाही. आज मागे वळून पाहताना वाटतं की ह्या गोष्टी आम्ही आपसूकच उचलल्या आहेत. मग तो सोऽहम् चा वेळेआधी झालेला जन्म असो नाही तर बॉम्बस्फोट झाल्यावर पर शहरात अडकून पडणं असो. कुठल्याही परिस्तिथीमध्ये गोंधळून जायला होत नाही.
बाबांची मुलगी असणाऱ्या माझ्यामध्ये मला आईच अनेक वेळेला व्यक्त होताना दिसली. आई आज पार्थिव रूपाने आपल्यामध्ये नाही. पण तिच्या आचार विचार आणि कृतीमधून आपल्यातच सामावून गेलेली आई कायम स्वरुपी आमच्या बरोबर आहे आणि यापुढेही अशीच व्यक्त होत राहणार आहे.
देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे आणि घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे. आई आमच्यासाठी खूप मोठा वारसा ठेऊन गेली आहे. आज आईचे हात घेण्याची वेळ आली आहे. ज्या दिवशी तिचे हात हातात येतील त्या दिवशी खऱ्या अर्थाने मी माझ्या आईची मुलगी असं म्हणता येईल.
व्यक्तीशी कितीही पटल नाही तरी कर्तव्यात चुकली नाही. १००% पटल. पूर्ण लेखच पटला पण हे वाक्य म्हणजे Nirmala in nut shell.
ReplyDeleteएकदम बरोबर लिहीले आहेस. 👍👏✌️🌹
ReplyDelete